पुत्रकाम्य कीर्तनं (श्रीगुरुचरित्र आधारित)
----------

पुत्रोत्साहीं संक्रांतीसी। श्राद्धकाळीं मृतदिवसीं।
न करावे स्नान उष्णोदकेंसी। पौर्णिमा अमावास्येसी॥ अध्याय ३६- ओवी १९३॥
वरील ओवीचे वेगवेगळे भाषांतरीत अर्थ वाचनांत आले. एका भाषांतरानुसार पुत्र हवा असल्यास, संक्रांतीला, श्राद्धकाळी, मृतदिनी तसेच पौर्णिमा अमावस्येला उष्णोदकाने स्नान करू नये. दुसरे एक भाषांतरकार म्हणतात, घरात मुलगा जन्माला आल्यावर,संक्रांतीच्या दिवशी, श्राद्धकाळी तसेच नातेवाईकाच्या मृत्युदिनी व पौर्णिमा किंवा अमावस्येला गरम पाण्याने स्नान करु नये.
श्रीगुरुचरित्रकारांना ह्या ओवीद्वारे निश्चित काय सांगायचे असेल ? या प्रश्नाचा शोध घेताना ‘संक्रांत’ हा शब्द सण म्हणून वापरला असेल का ? संक्रांत हाच सण का घेतला असेल ? तसेच ‘मृतदिवस’ ह्या शब्दातून कोणत्या नातेवाईकाचा मृत्यु अपेक्षित आहे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.
‘संक्रांत’ हे जसे सणाचे नाव आहे, तसेच ‘संक्रांत’ या शब्दाचा अर्थ ‘गमन’ असाही आहे. पुत्रोत्साही = पुत्र + उत्साही या शब्दातील पुत्र म्हणजे मुलगा व ‘उत्साह’ या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ ‘सुख’ असून मराठी ‘उत्साह’ या शब्दाचा अर्थ ‘आनंद’ आहे. त्यामुळे पुत्राच्या सुखाचे गमन झाल्यास म्हणजे पुत्रसुख जीवनातून निघून गेल्यास, त्या मृतपुत्राच्या अभागी बापाने (पित्याने) पुत्राच्या मृतदिनी, श्राद्धकाळी तसेच दर महिन्याच्या पौर्णिमा अमावस्येला गरम पाण्याने स्नान करु नये; असा अर्थ श्रीगुरुचरित्रकारांना अभिप्रेत असावा, असे मला वाटते.
नवजीव जन्माला घालणाऱ्या स्त्रीच्या ऋतुकाळाविषयी अध्याय ३७ मध्ये श्रीगुरुचरित्रकार लिहितात,
ऋतुकाळ असता स्त्रियेसी। गांवासी जातां पुरुषासी।
भ्रूणहत्या महादोषी। प्रख्यात असे परियेसा॥ २५२॥
अर्थ :- स्त्रिला मासिक ४-५ दिवसांचा ऋतुकाळ चालू असताना, तिचा पुरुष (तिचा नवरा) बाहेर गावी गेल्यास, भ्रूणहत्या केल्याचा महादोष त्या पतिला लागतो; हे प्रसिद्ध आहे, हे ऐका.
एकंदरीत मासिक ऋतुकाळाच्या शारिरिक त्रासांमध्ये स्त्रिला पतिच्या मानसिक आधाराची गरज पूर्वजांनी अधोरेखित केलेली दिसते. या काळात बाहेर गावी जाणाऱ्या पतिला, भ्रूणहत्या म्हणजे गर्भावस्थेतील जीवाची हत्या केल्याचा महादोष लागण्याची गंभीर शिक्षा पूर्वजांनी दिलेली दिसते.
पूर्वीच्या काळातील पुरुषी मानसिकतेचे प्रतिबिंब, श्रीगुरुचरित्रकारांच्या पुढील ओवीतून दिसून येते.
वृद्ध अथवा वांझेसी। मरत असती पुत्र जिसी।
बहु कन्या होती जिसी। चुकतां ऋतु दोष नाहीं॥२५३॥
अर्थ :- वृद्ध (म्हातारी) किंवा वांझ (संतान न होणारी स्त्री), मूल वाचत नसलेली स्त्री तसेच पुष्कळ मुली असलेली स्त्री (अशा बायकांच्या बाबतीत) ऋतुकाळ चुकला (म्हणजे मासिक ऋतुकाळामध्ये तिचा पति बाहेर गावी गेला तर त्या पतीला) दोष लागत नाही.
या ओवीवरुन दिसते, ‘मुलाला जन्म न देणाऱ्या स्त्रिच्या ऋतुकाळाची, तिच्या भावनांची त्या काळातील समाज पर्वा करीत नव्हता.’
स्त्रीकडे मुलाला जन्म देऊन वंशवृद्धी करण्याचे साधन पाहणाऱ्या समाजाने काही निरीक्षणांच्या आधारे मुलगा/मुलगी जन्माची गणित मांडण्याचा केलेला प्रयत्न ‘निर्णयसिंधू’ प्राचीन या ग्रंथात दिलेला आहे.
निर्णयसिंधू ग्रंथातील निरीक्षणांचा गोषवारा सांगणाऱ्या श्रीगुरुचरित्रातील पुढील ओव्या :-
ऋतु देतां चतुर्थ दिवसीं। पुत्र उपजे अल्पायुषी।
कन्या होय पांचवे दिवसीं। सहावे दिनीं पुत्र परियेसा॥३७ - २५४॥
अर्थ :- चवथ्या दिवशी ऋतु दिल्यास (स्त्री-पुरुष संबंध आल्यास) अल्पायुषी पुत्र, पाचव्या दिवशी (स्त्री-पुरुष संबंधातून) कन्या तर सहाव्या दिवशी (स्त्री-पुरुष संबंधातून) पुत्र होतो, हे ऐका.
विषम दिवसीं कन्या जाण। सम-दिवशीं पुत्र सगुण।
दहा दिवस ऋतुकाळ खूण। चंद्रबळ असावें॥३७-२५५॥
अर्थ :- विषम दिवशी (स्त्री-पुरुष संबंध आल्यास) कन्या होते. सम दिवशी (स्त्री-पुरुष संबंध आल्यास) गुणांसहित (गुणी मुलगा) जन्माला येतो.
जन्माला येणाऱ्या मुलगा अथवा मुलीच्या गुण - दोषांसंबंधीची निर्णयसिंधूतील मत श्रीगुरुचरित्रकारांनी अनुलेखाने टाळलेले दिसते. स्त्रीच्या ऋतुकाळानंतरचे १०दिवस म्हणजे ७व्या दिवसापासून १६व्या दिवसापर्यंत नव-जीव जन्माला घालण्यासाठी (स्त्री-पुरुष संबधासाठी) १० दिवस योग्य असून त्यासाठी चंद्रबळ पाहिजे; असे मत श्रीगुरुचरित्रातून सांगत असावेत, असे दिसते .
श्रीगुरुचरित्रात सांगितलेले दहा दिवस ऋतुकाळानंतरचे गर्भधारणेसाठी योग्य आहेत हे मत आजचे वैद्यकिय शास्त्रातही सांगितलेले आहे. या दहा दिवसात ‘चंद्रबळ’ आवश्यक आहे असे श्रीगुरुचरित्रीय मत आहे. चंद्राला पूर्वापार मनःस्थितीस कारणीभूत असलेला ग्रह मानले जाते. मुलगा किंवा मुलीची गर्भ जन्मण्यास, त्या गर्भाच्या आई-वडिलांची मनःस्थिती कारणीभूत नसेल ना ? शास्त्रीय संशोधन, श्रीगुरुचरित्रकारांच्या गर्भ धारणेस लागणाऱ्या चंद्रबळाच्या विचारावर, प्रकाश टाकू शकेल.
वरील ओव्यांमध्ये ‘गर्भ धारणेसाठी पुरुष स्त्रिला ‘ऋतु’ देतो’ असे सांगितलेले आहे. वैद्यकीय शास्त्र सांगते, आई-वडिलांच्या गुणसूत्रांतून स्त्री अथवा पुरुष गर्भ जन्माला येतो. स्त्री XXच्या गुणसूत्राला पुरुषाचे XY गुणसुत्रांमधील X गुणसूत्र संयोग पावते, तेव्हा मुलगी जन्माला येते. स्त्रीच्या XX गुणसूत्राशी पुरुषाचे XY गुणसुत्रांमधील Y गुणसूत्र संयोग पावते, तेव्हा मुलगा जन्माला येतो.
‘गर्भधारणेतील स्त्रीबीजाशी संयोग पावणाऱ्या पुबीजातील गुणसूत्रावरस्त्री की पुरुष जन्माला येणार अवलंबून आहे’ याचाच अर्थ मुलगा किंवा मुलगी जन्माला येण्यास पुरुषाच्या संयोग पावणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून आहे. समाज मात्र हा दोष स्त्रीच्या माथी मारतो.
‘मुलगा जन्माला यावा’ यासाठी कीर्तनातून श्रीगुरुचरित्रातील ओव्यांचे दाखले दिलेले ऐकू आले . परंतु ‘जूने ते सोने’ म्हणून श्रीगुरुचरित्रकारांनी निर्णयसिंधूतील सर्व मतांची री ओढलेली दिसत नाही. संस्कृतमध्ये कीर्तनं शब्दाचा अर्थ ‘सांगणे, वाखाणणे, उच्चारणे’ असा आहे. मराठीत ‘कीर्तन’ शब्दाचा अर्थ संकूचित होऊन ‘हरिकथा तसेच वाखाणणी’ आहे. नारदमुनी हे संस्कृतातील कीर्तनं परंपरेचे जनक मानले जातात. अशा या प्राचीन कीर्तनपरंपरेच्या पाईकांनी काळानुसार बदल करुन, समाजाला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. मध्यंतरी एका प्रतिथयश कीर्तनकारांनी ‘मुलगा जन्माला यावा’ यासाठी प्राचीन ग्रंथातील काही उपाय सांगितले. या अशास्त्रीय उपायांवर गदारोळ झाल्यावर, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. जुन्या ग्रंथांमधील अशास्त्रीय मतांना प्राधान्य देऊ नये. जगात पुराव्या अभावी कोणताही सिद्धान्त सिद्ध होत नाही. त्यामुळे असा अशास्त्रीय सिद्धांत सांगून, सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करु नये.
वास्तविक कीर्तनकार, साहित्यिक,व्याख्याते, नाटक-चित्रपटकार इत्यादि लोकांनी संत साहित्यासारखे समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. डिसेंबर १९८१ साली लेखक व पत्रकारांनी मुंबई येथे भरविलेल्या समांतर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध लेखिका मालतीबाई बेडेकरांनी भूषविले होते. अध्यक्षीय भाषणात मालतीबाई म्हणतात, “साहित्य म्हणजे जीवनाचा पडसाद हे खरेच आहे, पण तो माणसांच्या जीवनाचा पडसाद असतो. साखळीला बांधलेल्या पाळीव प्राण्यांच्या जीवनाचा नव्हे.” १९८१ मध्ये स्त्रीस्वातंत्र्य पुरस्कर्त्या मालतीबाईंनी बुद्धिवंताना दिलेला इशारा सध्याच्या काळातही योग्य आहे.
-------अनुराधा आठवले, नाशिक
॥जय श्रीगुरुदेवदत्त॥