पांडव लेणी, नाशिक

‘पांडव लेणी’ आमच्या नाशिकचा नैऋत्य स्वागत कक्ष. मुंबईहून नाशिकला येताना, रस्त्याच्या उजव्या बाजूला डोंगरावरील गुहांची माळ दिसायला लागली की, आपले गाव आले; ही सुखद् जाणीव आम्हा नाशिककरांना होते. पाथर्डी फाट्याजवळील त्रिरश्मी डोंगराच्या कुशीतील पांडवलेणी जशी इतिहास अभ्यासकांना आकर्षित करतात; तसाच त्रिरश्मी डोंगर गिर्याभ्रमण करणाऱ्यांना सदैव साद घालत असतो.मोबाईल(G.P.S.)च्या जमान्यातही नवख्या गिर्यारोहकांना परतीची वाट सापडत नाही. नासिकचे अनुभवी गिर्यारोहक त्यांना मदत करतात. कधी-मधी बिबट्याचे दर्शन ह्या डोंगरावर होत असते.
स्थानिक वृत्तपत्रांत अशा विविध बातम्यांनी ‘पांडव लेणी’ गाजत असतात. पांडव लेण्यांमध्ये अप्रतिम अशी बौद्ध व जैन शिल्प आहेत. ह्या लेण्यांचे नाव ‘पांडव लेणी’ हा ही एक अभ्यासाचा विषय !
नाशिकमधील सेवानिवृत्त विज्ञान शिक्षिका सौ. जेनी मॅडम ह्यांनी पांडव लेण्यांवर छायाचित्रांसहित एक अभ्यासपूर्ण पुस्तिका1 तयार केली. ह्या पुस्तिकेतून पाण्डव लेण्यांमधील २४ गुहांमध्ये ग्रंथित केलेला सुमारे २००० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा, पहावयास मिळतो. पूर्वीच्या काळी, व्यापारी मार्गावर भिक्षू तसेच व्यापारी लोकांच्या वास्तव्यासाठी; ही लेणी राजाश्रय, व्यापारी लोकांचे अर्थसहाय्य तसेच गंगापूर रस्त्यावरील गोवर्धन गावातील सर्व सामान्य माणसाच्या आर्थिक साहाय्यातून उभारल्याचे येथील शिलालेखांद्वारे समजते. एकूण २४ लेण्यांमधील लेणी क्रमांक १० व ११ जैन शिल्पचित्रांनी ११व्या शतकांत सजली असावीत. बाकीच्या लेण्यांमधील बौद्ध शिल्प इसवी सन पूर्व १०० वर्षांपूर्वीची असावीत, असे तज्ज्ञ लोकांचे मत आहे.
मुंबई प्रेसिडेंसीच्या १८८७च्या गॅझेट नोदींनुसार, पाथर्डी गावातील एका ब्राह्मणाने ह्या लेण्यांचे ‘पांडव लेणी’ नामकरण केले. येणाऱ्या पर्यटकांना तो ब्राह्मण ह्या लेण्यांची माहिती देत असे. बुद्ध व बोधीसत्त्वाच्या तसेच जैन प्रतिमांना एखादी व्यक्ती पांडव बंधुंच्या रुपात कसे दाखवू शकेल ? पांडव किंवा महाभारत कथा एकाही शिल्पांत दिसत नाही.
ह्या डोंगरातील गुहांमधील योग्य खडकांवर प्राचीन कारागीरांनी छिन्नी व हातोडीच्या सहाय्याने लेणी निर्माण केली.
लेणी ह्या शब्दाची व्याख्या, शब्द कोशातील अर्थानुसार,
लेणे = गुहादिकांतून प्राचीन काळी कोरलेले पांडवकृत्य
पांड = बिघ्याचा विसावा अंश
{एक ‘बिघा’ जमिनीवर ५ उभ्या व ४ आडव्या काठ्या ठेवल्यास आयताकृती २० चौकोनाची चौकट तयार होईल. ह्या चौकटीतील एक आयताकृती चौकोन म्हणजे १ पांड असावा.}

पांडव लेण्यामधील पहिल्या गुहेपासून दिसणारे चौकटीचे शिल्प (Central rail design) बहुसंख्य गुहांमध्ये सौ. जेनीमॅडमनी ह्या पुस्तिकेत नमुद केलेले आहे.
‘पांड’ ह्या लघुत्तम परिमाणाचा प्राचीन स्थापत्त्य शास्त्रातील ठेवा, पूर्वजांनी ‘पांडव लेणी’ नावाने आपल्या हाती दिला असेल का ?
पांडव लेणी नावातून ‘पांड’ ह्या प्राचीन मापन परिमाणाची माहिती मिळते; तशीच ‘नाशिक’ नावातून नवशिखांमध्ये वसलेल्या सुमारे ६ कोटीवर्षांपूर्वीच्या सरोवराची (ब्रह्मपुराणांतील2 उल्लेखानुसार) भौगोलिक माहिती मिळते. भौगोलिक दृष्ट्या हे सरोवर चाकोरी गावाजवळील चक्रतीर्थ पासून ओढा गावापर्यंत असावे. प्राचीन पोथ्यांमध्ये ‘नाशिक’ हा उल्लेख आढळतो.
श्रीगुरु नृसिंहसरस्वती ह्यांच्या नाशिक आगमनाविषयी वर्णन करताना, श्रीगुरुचरित्रकार (श्री सरस्वती गंगाधर साखरे) म्हणतात,
शिष्यांसहित गुरुमूर्ति। आले नाशिक-क्षेत्राप्रती।
तीर्थमहिमा असे ख्याति। पुराणांतरी परियेसा॥ अध्याय १३, ओवी क्रमांक ६०॥
‘लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले’ ह्या रामायणकालीन घटनेमुळे नाशिकला ‘नासिक’ असे नाव मिळालेले दिसते. नाशिक, नासिक तसेच नाशिकजवळील पांडवलेणी, चाकोरी, गीनस (सध्याचे गणेशगाव), बेजे, त्र्यंबकेश्वर ही सर्व क्षेत्रांची नावे इतिहासरुपी वटवृक्षाच्या पारंब्या आहेत. ह्या नावांमधून त्या ठिकाणचा नैसर्गिक तसेच मानवनिर्मित इतिहास समजण्यास मदत होते. त्रिरश्मी डोंगरावरील पांडव लेण्यामधील शिल्पांचा पाच पांडवांशी कोणताही संबंध नाही. मध्यंतरी ‘त्रिरश्मी लेणी’ नावाने ह्या लेण्यांची बातमी वर्तमानपत्रांतून आली होती. अशाप्रकारे लेण्यांचे नाव बदलल्यास, लेण्यांच्या स्थापत्य शास्त्रातील ‘पांड’ हे प्राचीन परिमाण पुढील पिढ्यांना समजणारही नाही. त्यापेक्षा पांडव लेणी मध्ये अस्तित्वात असलेले ‘पांड’ परिमाणाच्या आयताकृती शिल्पातून लेणी निर्मितीतील, प्राचीन स्थापत्य शास्त्र, तज्ज्ञ लोक उलगडू शकतील.
प्राचीन स्थापत्यशास्त्र, खडकावरील एखादे शिल्प किंवा अर्धवट सोडलेले कोरीव काम असलेल्या गुहेला/ गुंफेला ‘लेणी’ हा दर्जा देत नसावे.
सिंहस्थ काळांत साधू लोक वापरत असलेल्या भीम गुंफांचे ‘तपोवन लेणी’ असे नामकरण झाल्याचे वाचनात आले. पांडव लेण्यांशी जसा महाभारतातील पाच पांडवांचा संबंध नाही; तसाच पंच पांडवांमधील बलवान अशा भीमाचा ह्या गुंफांशी काहीही संबंध नाही, हे सत्य आहे. आपल्या पूर्वजांनी नदीपात्रातील ह्या रचनेला ‘भीम गुहा’ न म्हणता ‘भीम गुंफा’ संबोधलेले आहे. कारण गुहा म्हणजे डोंगराचा पोकळ भाग; तर गुंफा म्हणजे डोंगरात राहण्यासारखी कोरलेली जागा. भीम गुंफा साकारताना पाण्याच्या प्रचंड (भीम=भयंकर) लोटाने चिकण मातीचा ढीग कोरलेला असावा. नासिकच्या काचमिश्रित चिकण मातीने३ ह्या गुंफांना मजबूती दिलेली असावी. ह्या गुंफांचे नाव बदलल्यास, नैसर्गिक बदलाची साक्षीदार असलेली एक कडीच, आपण गमावून बसू.
मानव-निर्मित 'पांडव लेणी' तसेच निसर्ग निर्मित 'भीम गुंफा' संवर्धनास शुभेच्छा :-
इतिहासाच्या नामोनामी। वसे पुरातत्त्वीय चारधामी।
येईल नाममाहात्म्य कामी। साधण्या ऐतिहासिक वृक्ष संवर्धन॥
अनुप्रभा, नाशिक
संदर्भ:-
1.The Pandavleni Caves on Trirasmi Hill – Mrs. Genny Mascarenhas
(Retired Teacher – Nirmala Convent School, Nashik)
2. ब्रह्मपुराण अध्याय ८९श्लोक क्रमांक ४५
३. ‘नाशिक-तळ्यांचे शहर’ - अप्रकाशित संशोधन डॉ. रत्नाकर पटवर्धन, नाशिक.
॥जय श्रीगुरुदेव दत्त॥