परंपरागतांचे आधुनिक वारे
महाराष्ट्रातील आद्य शालेय दिंडी आमच्या ग. ग. हायस्कूल नाशिकची.
आषाढी एकादशी म्हटल की, आठवण होते ती, ४०वर्षांपूर्वी आमच्या ग. ग. हायस्कूल, नाशिकमध्ये निघणाऱ्या दिंडीची ! नुकत्याच बदलून आलेल्या आदरणीय सरिता उजागरेबाई ह्या मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनींना वारकरी जीवनाची ओळख व्हावी, ह्या उद्देश्याने ही दिंडी सुरु केली. ह्या दिंडीमध्ये काही मुली नऊवारी लुगड (साडी) नेसून, डोक्यावर पदर घेऊन स्त्री-वेशात तर काही विद्यार्थिनी धोतर, टोपी, सदरा, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ अशा पुरुष वेशात; पायात चपला न घालता हातात पताका घेऊन तर काही बायकांच्या डोक्यावर तुळशीची कुंडी, अशा वेशात सहभागी झालेले असायचे. दिंडीत टाळ, मृदुंग, चिपळ्या, झांजा ही वाद्ये हे बाल-वारकरी वाजवायचे. ह्या वाद्यांच्या तालावर विठ्ठू नामाचा गजर करीत, ही दिंडी आमच्या शाळेच्या दगडी इमारतरुपी विठोबाला प्रदक्षिणा घालायची. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस कोणताही अडथळा न करता; आमचे ग. ग. वारकरी
“विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल “
“बोला पुंडलिक, वरदा हरी विठ्ठल “
“ग्यानबा-तुकाराम, तुकाराम महाराज की जय”
असा विठ्ठू नामाचा गजर करीत, बेधुंद होऊन नाचायचे. शाळेच्या गेटबाहेर, रस्त्यावरुन जाणारे लोक, ही दिंडी पहाण्यासाठी गर्दी करायचे.
काळाच्या पुढे ४०वर्षे चालणाऱ्या ग. ग.च्या माननीय मुख्याध्यापिका सरिता उजागरेबाईंना सादर प्रणाम.
स्त्री-पुरुष, उच्च-नीच, जात-पात, गरीब-श्रीमंत इत्यादी भेद विसरुन खेड्यातील माणूस, शतका नु शतके पंढरीची वाट चालत असतो. ग्यानबा-तुकाराम, नामदेव महाराजांच्या पालख्या नेणारे वारकरी, तहान-भूक, चिंता विसरुन, विठोबाच्या ओढीने आषाढी-कार्तिकेला जात असतात. दिंडीची सुरवात भक्त पुंडलिकाने केली, असे मानले जाते.
दिंडीगाण म्हणजे दिंडी नावाच्या वाद्यांच्या सुरात पदे गात, भिक्षा मागणाऱ्या साधूंचा संप्रदाय. दिंडीगाण ह्या शब्दावरुन ‘दिंडी’ ह्या प्राचीन वाद्यामुळे वारकऱ्यांची दिंडी हे नाव प्रचलित झाले असावे.
दिंडी म्हणजे आळंदी -पंढरपूरसारख्या क्षेत्राला जाणाऱ्या हातात पताका टाळ-चिपळ्या घेऊन नाचत व भजन करीत जाणाऱ्या वारकऱ्यांचा-भक्तांचा समुदाय होय.
सध्या शाळा-शाळांमधून चालणारे दिंडी-सोहळे आपण पहातो-वाचतो; पण दिंडीचे आधुनिकरण तर होत नाही ना ? अशी शंका मनात येते. काल सकाळी कॉलेज-रोडवरुन, नाशिकच्या नावाजलेल्या शाळेची, दिंडी ढोल-ताशांच्या गजरांत(?) जाताना पाहिली.
वास्तविक दिंडीतील वारकरी एकमेकांना ‘माऊली’ नावाने संबोधतात. शालेय माऊलींना, ‘वारकऱ्यांचे जीवन-त्यांच्यातील भक्तीरस’ ह्यांची ओळख ढोल-ताशांच्या तालात कशी समजणार ?
पूर्वीपासून सारखे चालत आलेल्या परंपरागताचे पुनरुज्जीवन करण्याचा स्तुत्य प्रयत्न, शाळांमधून-टिव्ही मालिकांमधून होताना, आपण पहातो. स्टार-प्रवाह ह्या दूरचित्रवाहिनीवर, संध्याकाळी ७वाजता ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका प्रसारीत होते. ह्या मालिकेतील दत्त-जन्मकथा श्रीगुरुचरित्रांत सांगितलेल्या कथेपेक्षा खूप वेगळी आहे. श्रीगुरुचरित्रातील ‘श्रीदत्त जन्म कथा’ नारद-पुराणाच्या आधारे सांगितलेली आहे.
‘श्रीगुरुदेव दत्त’ ह्या मालिकेत खग्रास-सूर्यग्रहणाचा त्रास, फक्त अत्रि ऋषींनाच झाल्याचे दाखविले होते. कडाक्याच्या थंडीमुळे मालिकेतील अत्रिऋषी, पत्नीच्या नावाचा धावा करीत, मुर्च्छित पडले. बाकी सर्व पात्रे खग्रास ग्रहणातही आरामात हिंडत होती. काल अत्रि ऋषींनी, आपल्या पत्नीला ओवाळून ‘पत्निव्रताचा’ नवीन पायंडा पाडलेला दिसतो.
ऋग्वेदातील पाचव्या मंडळातून ‘अत्रीऋषी’ हे खगोलशास्त्रज्ञ होते, हे समजते. चित्रकूट पर्वतावरुन पाहिलेल्या खग्रास-सूर्यग्रहणाच्या नोंदी श्री अत्रिऋषींनी करुन ठेवलेल्या आहेत. लोकमान्य टिळकांनी आपल्या ‘ओरायन’ पुस्तकात गणिताच्या आधारे, अत्रि ऋषींच्या नोदींवरुन हे खग्रास-सूर्य ग्रहण सुमारे ७५००वर्षांपूर्वी घडले असावे, असे म्हटले आहे.
सुमारे ७५००वर्षांपूर्वी सामान्य माणसाला न्याय मिळावा, म्हणून अत्रि ऋषींनी लोकतंत्र राष्ट्र व्यवस्थेचा पुरस्कार केला. तत्कालीन आसुरी प्रवृत्तीच्या राजांनी अत्री ऋषींना दिलेल्या कठोर शिक्षेचा उल्लेख, ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ११६व्या सूक्तातील आठव्या ऋचेत पुढीलप्रमाणे आहे
‘ ऋबीसे अत्रिमश्विनाववनीतमुन्निन्यथुः’
भावार्थ:- “अहो अश्विनीकुमार देव हो, प्राणांतिक देहदंड करण्याच्या उद्देश्याने अत्रीमुनींना ऋबीसमध्ये ठेवले असता, तुम्ही त्या संकटातून अत्रींना बाहेर काढलेत; या बद्दल तुम्हाला धन्यवाद.
{ऋबीस म्हणजे कठोर शिक्षा देणारे स्थान}
लोकशाहीतंत्राचे आद्य जनक असलेल्या अत्री ऋषींची पत्नी ही कर्दमऋषींची कन्या होय. श्रीगुरुचरित्र अध्याय ४था मध्ये अत्रीपत्नीच्या नावाचा उल्लेख ‘अनसूया’ आहे.