पतिव्रता [श्रीगुरुचरित्र : अध्याय ३१] नियमावली(?)
न करिजे इष्टती शेजारणीशीं। रजकिणी स्त्री कुहकीसी।
जैनस्त्री दरिद्रिणीसी। इष्टत्व करितां हानि होय॥३१-६१॥
अर्थ :-“शेजारणीशी आपल्या मनात इच्छिलेले व्यवहार करु नयेत. (पतिस न विचारता, शेजारणीशी परस्पर व्यवहार करु नयेत). धोबिणीने कपटी स्त्रीशी, जैनस्त्रीने दरिद्री (गरीब) स्त्रीशी, आपल्या इच्छेनुसार (इच्छिलेले) (व्यवहार परस्पर ) केल्यास हानी होते.”
वरील ओवीत दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यावरुन जैन स्त्रिला श्रीगुरुंनी आपले मानलेले दिसते. श्रीगुरुंच्या काळात धोबीण तसेच जैन स्त्री यांचा काही प्रमाणांत बाह्य जगाशी संबंध येत असावा.
श्रीगुरु अवतार काळांत (इसवी सन १३७८ ते १४५९) दक्षिण भारतात बहामनी सल्तनत अस्तित्वात होती. या परधर्मीय आक्रमकांपासून हिंदू स्त्रीचा बचाव करण्यासाठी, स्त्री-जातीस चार भिंतीत बंद करणारे ‘पतिव्रता नियम’ समाजाने पुरस्कृत केलेले दिसतात.
रामायणकालिन अहिल्या कथा, सीतेची अग्निपरिक्षा ह्या कथांवरुन भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून स्त्रिला दुय्यम स्थान मिळालेले दिसते. महाभारतात पंच पांडवांनी, आपल्या पत्नीस (द्रौपदीला) द्युत खेळताना पणास लावणे, ह्या कथेत स्त्रिला उपभोग्य वस्तुचा दर्जा दिलेला दिसतो. स्कंदपुराणातील काशीखंडात ‘अगस्त्य-लोपामुद्रा’ कथेत स्त्रियांनी आचरण करण्याचे पुष्कळ धर्म सांगितले आहेत. रामायण-महाभारत-पुराणकाळापासून ते २१व्या शतकातील आधुनिक भारतीय समाजात महिलेचे स्थान आजही दुय्यम आहे, हे जाणवते. रोजच्या वर्तमानपत्रांत स्त्रीवरील अत्याचाराची बातमी असते. विविध नियम किंवा कायदे लादून, समाजाचे प्रश्न सूटत नसतात. प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न, त्याच्या भोवतालची स्थिती, त्या व्यक्तीचा स्वभाव ह्या बाबींवर, त्या व्यक्तीची समाजातील वागणूक अवलंबून असते.
वैदिक धर्मातील समाज-पुरुषाची संकल्पना, पुरुष सूक्तात मांडलेली आहे. पुरुष सूक्तात वर्णन केलेल्या ह्या विराट पुरुषाचे वर्ण विभाजन (ऋचा क्रमांक ११) पुढीलप्रमाणे :-
ब्राह्मणोस्य मुखमासीत्। बाहू राजन्यः कृतः॥
ऊरु तदस्य यद्वैश्यः। पद्भ्यागुं शूद्रो अजायत ॥१० -११॥
अर्थ : (त्या विराट पुरुषाचे) ब्राह्मण हे मुख, क्षत्रिय बाहू आणि वैश्य मांड्या झाले आहेत. त्याच्या पायांपासून शूद्र निर्माण झाले आहेत.
समाज-पुरुषाच्या विभाजनात स्त्री-पुरुष असा लिंग-भेद अथवा काळा-गोरा असा कातडीच्या रंगाने भेद केलेला दिसत नाही. प्रत्येक व्यक्तीचे स्वाभाविक कर्म म्हणजे त्या व्यक्तीचा वर्ण (रंग) होय.
श्रीमद् भगवद् गीतेतील अध्याय १८ मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या चारही वर्णांची संकल्पना पुढीलप्रमाणे सांगितली आहे.
ब्राह्मण क्षत्रिय विशाम् शूद्रणाम् च परंतप।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैः गुणैः॥१८-४१॥
अर्थ :- हे पराक्रमी अर्जुना ! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र यांची कर्मे त्यांच्या प्रकृतीच्या स्वाभाविक गुणांप्रमाणे निरनिराळी असतात
{ निष्कर्ष :- मनुष्याच्या स्वभाव सिद्ध गुणांनुसार मनुष्याचा वर्ण ठरतो.
[वर्ण वारसाहक्काने मिळत नसतो.] }
१) ब्राह्मण वर्ण :-
शमः दमः तपः शौचम् क्षान्तिः आर्जवम् एव च।
ज्ञानम् विज्ञानम् आस्तिक्यम् ब्रह्मकर्म स्वभावजम्॥ १८-४२॥
अर्थ :- मनोनिग्रह, इंद्रियदमन, तप, अंतर्बाह्य, शुचिर्भूतपणा, मनःशांती, मनाचा सरळपणा, क्षमाशीलता, ज्ञान-विज्ञान (अध्यात्मज्ञान) आणि आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणाची स्वभावजन्य कर्मे आहेत.
{ निष्कर्ष :- ज्या समाजातील ब्राह्मण शांति, क्षमा, तप, श्रद्धा, ज्ञान-विज्ञान ह्यांचा निग्रह तसेच ऋजुता आणि पवित्र ब्रह्म कर्म करणारे असतील; त्या समाजाचे पुरुषसूत्रातील मुख योग्य मार्गदर्शन करणारे असते.}
२) क्षत्रिय वर्ण :-
शौर्यम् तेजः धृतिः दाक्ष्यम् युद्धे च अपि अपलायनम्।
दानम् ईश्वरभावः च क्षात्रम् कर्म स्वभावजम्॥१८-४३॥
अर्थ :- शौर्य, तेजस्विता, धैर्य, दक्षता, युद्धातून पळून न जाणे, दातृत्व आणि शासनप्रभुत्व ही क्षत्रियाची स्वभावजन्य कर्मे आहेत.
{ निष्कर्ष :- ज्या समाजाचे क्षात्र गुणांचे सैन्य तसेच नेतृत्व असेल, त्या समाजाचे पुरुषसूत्रानुसार बाहू बळकट असतात. अन्यथा
दुर्बलांच्या शब्दांना मान कोण देणार ? }
३) वैश्य व ४)शूद्र वर्ण :-
कृषि गौरक्ष्य वाणिज्यम् वैश्यकर्म स्वभावजम्।
परिचार्यात्मकम् कर्म शूद्रस्य अपि स्वभावजम्॥ १८-४४॥
अर्थ :- शेती करणे, पशुपालन करणे आणि व्यापार करणे ही वैश्याची स्वभावजन्य कर्मे आहेत; तर सर्व प्राणिमात्रांची सेवा करणे, हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म होय.
{ निष्कर्ष :- शेती पशुपालन तसेच व्यापार ही समाजाची आर्थिक बैठक असल्याने वैश्य म्हणजे समाजपुरुषाच्या मांड्या होत.
समाजाला आरोग्य सेवा देणारे वैद्यकिय क्षेत्र, समाजातील बांधकाम करणारे अभियंता क्षेत्र, समाजातील कायदेविषयक सल्लागार तसेच बुद्धिजीवी संशोधकांपासून ते श्रमजीवी कामगारांपर्यंत सर्वजण समाजाची सेवा करीत असतात. ‘समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ ह्या उक्तीनुसार शूद्र हा घटक समाज-पुरुषाचे पाय बळकट करीत असतो.}
परंतु दुर्दैवाने जातीभेदाच्या भिंतींनी शूद्र ह्या चवथ्या वर्णास क्षूद्र म्हणजे हलके काम करणारा समजून ‘तुच्छ’ समजले गेले. स्त्री-जातीची गणना तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या सेवा-कर्माने शूद्र (कःपदार्थ) केली जाते.
वर्णाधिष्ठित वैदिक धर्म पुरस्कर्त्या श्रीगुरुचरित्रात अध्याय ३१ मध्ये ‘स्त्रियांना कमी लेखले आहे’, असा ‘वादप्रचुर प्रवाद’ आहे. श्रीगुरुंनी हिंदू संस्कृतीतले कर्मठ नियम सांगताना, महिलेला नियम पाळण्याची जबरदस्ती केलेली दिसत नाही.
श्रीगुरु उवाच
तुज मानेल जें बरवें। तेचिं तुवां अंगिकारावें।
स्त्रियांची रहाटी मी स्वभावें। सांगेन ऐक एकचित्तें॥३१-४॥
अर्थ :- “तुला जे बर (योग्य) वाटेल, तेच तू अंगिकारावेस (स्वीकारावेस). माझ्या स्वभावानुसार, मी स्त्रियांची राहणी सांगेन; ती तू एकचित्ताने ऐक.
॥ जय श्रीगुरुदेव दत्त॥
संदर्भ :- http://bhagawad-geeta.com/