दंगलीतले मंगलाचरण

सध्या वर्तमानपत्रांमध्ये भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा विषयीची मत-मतांतरे सांगणाऱ्या बातम्या वाचनास मिळतात. ह्या कायद्याने ईशान्य भारत ढवळून निघालेला दिसतो. ह्या कायद्याला आसामी लोक कविता-गाणी अशा सुसंस्कॄत साहित्यिक मार्गाने विरोध करताना दिसतात, तर काही ठिकाणी ह्या विरोधाला हिंसक वळण लागून दंगली घडताना दिसतात. दंगलीच्या बातम्या वाचताना, मी नेहमी ‘दंगल’ ह्या शब्दावर थबकते. दंगल हा शब्द मला सिन्नरच्या दंगलीत घेऊन जातो --------
मला वाटते ते १९७२-७३ साल असावे. त्याकाळी इयत्ता ७वीची परिक्षा पास झाल्यावर फायनल(पी.एससी.)ची परिक्षा उत्तीर्ण झाल्यास, प्रशिक्षणानंतर प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक होत असे. ग. ग. हायस्कूल नाशिक तर्फे फायनल(पी.एस सी.)ची परिक्षा कंडक्ट केली जात होती. ग. ग. हायस्कूल नाशिक येथे शिक्षिका म्हणून मी कार्यरत होते. आम्हा शिक्षकांना निरनिराळ्या केंद्रांवर परिक्षा घेण्यासाठी पाठविले जायचे. आमच्या शाळेतील मी व माझ्या सहकारी शिक्षिका - ओकबाई, पंडित बाई, शालिनी कुलकर्णीबाई व आमचा दत्तू शिपाई यांची सिन्नर केंद्रावर परिक्षा घेण्यासाठी नेमणूक झाली. वर्तमानपत्रे रोज सिन्नर दंगलीच्या नव-नवीन बातम्या घेऊन येत होती. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाईंनी आम्हाला सिन्नरला जाण्याचा हुकूम दिला; आता काय करायचे? हुकूम तर पाळलाच पाहिजे, नाही म्हणायची सोय नव्हती. मनांत धाकधूक होती. आमच्या चमूने दुसऱ्या दिवशी सिन्नरला प्रस्थान केले.
परिक्षेच्या साहित्याचे एक मोठे पार्सल तसेच आमच्या वैयक्तिक सामानासह आम्ही पाचही जण सिन्नरच्या टॅक्सीत बसलो. आमच्या मनात सिन्नर दंगलीचे विचार येत होते. एक प्रकारचे भयचक्र मनांत घोंगावत होते. सिन्नर जवळ आल्यावर आमच्या टॅक्सीवर जोरजोराने काठ्या मारल्याचा आवाज आला. आमची पाचावर धारण झाली. टॅक्सीने आम्हाला शाळेच्या आवारात आणून सोडले. शाळेतील एक वर्गखोली आम्हाला रहाण्यासाठी दिली होती. त्या खोलीत आमचे सामान टाकून, आम्ही हुऽऽश्य केले. प्रत्येकाने बरोबर जेवणाचे डबे आणले होते, पण जेवणाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. रात्र झाली लवकर झोप येईना; उद्या काय ?
सकाळ झाली. आम्ही सर्वजण परिक्षा केंद्राची पाहणी करण्यासाठी केंद्रावर आलो. बाहेर बोर्डावर विद्यार्थी व त्यांची आसन व्यवस्था बघण्यासाठी विद्यार्थी जमा झाले होते. आम्हीही तेथेच होतो. रस्त्यावरुन कोणीतरी एक दगड भिरकावला तो दगड नेमका एका विद्यार्थ्याच्या गुडघ्यावर बसला. तो मुलगा जोरात किंचाळला. दंगलीची पहिली सलामी झाली. गावात मोर्चे घोषणा लोकांची गडबड सुरु होती. दंगलीचे वातावरण चांगलेच पेटले. दुपार झाली, आम्ही आमच्या खोलीवर परत आलो. आमचा दत्तू शिपाई म्ह णाला, “बाई तुम्ही खोलीत बसा. मी दार लावून दाराबाहेर उभा राहतो.”
खोलीत बसलेल्या आमचे डोळे चुरचुरायला लागले. त्यामुळे आमच्या लक्षात आले, बाहेरचे वातावरण तापू लागले आहे. पोलिस जमाव हटविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या हवेत सोडत असावेत. लोकांचा आरडा-ओरड, घोषणा आणखीन वाढल्या. लोक जास्त चवताळले असावेत. अचानक एक घोळका शाळेत शिरला. आमच्या बंद खोलीच्या दरवाजावर धडका मारु लागला. आमच्या दत्तूशिपायाचा विरोध कमी पडला. दरवाजा उघडला गेला. दरवाजातून काळेकभिन्न धिपाड अंगात बनियन व अंडरपॅन्ट घातलेले दोन गुंड आरडा-ओरड करीत, आमच्या खोलीत आले. आम्ही सर्व शिक्षिका भयभीत झालो, काय करावे? मी मनाशी विचार केला, अगदी शांत रहायचे. आपण घाबरलेलो आहोत, असे दाखवायचे नाही. मी पुढे होऊन त्या गुंडांना शांतपणे विचारले, “तुम्हाला काय पाहिजे?” ते गुंड म्हणाले, “आम्हाला पाणी पाहिजे.” मी माठाकडे बोट करुन त्या गुंडांना सांगितले, “तुम्ही पाणी प्या.” ते गुंड पाणी प्याले व निघून गेले.
त्या गुंडांचे ते सज्जन वागणे पाहून गुंड निर्मिती परिस्थितीने होत असावी, असे आजही मला वाटते. व्यावसायिक गुंडांच्या सहाय्याने दंगल पेटवली जात असावी. अशा दंगलीत निरपराध लोकांचे बळी जात असतात. आमच्यातील शालिनी कुलकर्णीबाई अविवाहित होती. आमच्यापेक्षा लहान होती. शालिनी आम्हाला म्हणाली, “तुम्ही सर्व जणी लग्न झालेल्या आहात, पण माझे काय ?” मी शालिनीला सांगितले, “ बाई अविवाहित आहे की विवाहित आहे याचा गुंड विचार करीत नाही. त्याच्यासाठी ती फक्त ‘बाई’ असते. आत्ताचे गुंड सज्जन निघाले. पाहूया परिस्थिती कशी निवळते ते!”
आमच्या वर्गखोलीच्या बंद दाराच्या फटीतून आम्ही बाहेरच्या दंगलीचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत होतो. रस्त्यावरील दंगल जास्तच हिंसक झालेली दिसत होती. दुकाने जळत होती. लोक मारामाऱ्या करीत होते काही लोक जीवानिशी पळत होते. पोलिसांची धावपळ ऐकू येत होती. समोर वाढून ठेवलेल्या ह्या भीषण परिस्थितीने, आम्ही चौघीजणी हादरलो होतो. दिवस तर संपत चालला, रात्र कशी जाणार?---
शाळेच्या खोलीत रात्र काढणे, कठीण होते. आम्ही अंगावरील कपड्यानिशी त्या जोशीनामक देवदूताबरोबर बाहेर पडलो. पैसे घेणे, खोली बंद करणे काहीच सुचले नाही. आमचा द त्तू शिपाई मात्र म्हणाला, “बाई, तुम्ही जोशीभाऊसाहेबांच्या घरी जा. मी खोलीपाशी थांबतो.” त्या खोलीत उद्याच्या परिक्षेचे पेपर होते. द त्तू ला एकटे सोडून जाणे, मनाला पटत नव्हते. परंतु आमच्यासमोर कोणताच पर्याय नव्हता.
आम्ही जोशीक्लार्कच्या मागे अक्षरशः पळत होतो. जोशी आम्हाला दंगलीतून मार्ग काढीत, त्याच्या घरी घेऊन गेला. रस्त्यावरुन जाताना दुकाने जळत होती. लोक रॉकेल टाकून दुकाने जाळीत होते. घोषणा देत होते. रस्त्यावर चपला दगड पसरलेले होते. पोलीसांची गाडी आली की लोकांची पळापळी सुरु होत होती. वाटेत ६ प्रेते पडलेली दिसली. भयानक वातावरण पाहिले.
जोशीच्या वाड्यात त्यांच्या आईने दार उघडले. आ ईचे वय काय असावे? मान डुगडुगत होती, चालताही येत नव्हते. त्या बाईंनी आमचे स्वागत केले. त्या आम्हाला म्हणाल्या, “तुम्ही बसा. मी जेवण करते.” आम्ही म्हटले, “अहो, जेवण नको. आम्हाला भूक नाही.” तरीही त्या बाईंनी डुगडुगत्या मानेने, थरथरत्या हाताने आमच्यासाठी पिठले-पोळ्या केल्या. आम्ही जेवलो. त्यांनी आमची झोपण्याची व्यवस्था केली होती, पण झोप कसली येते? ‘उद्या परिक्षा कशी होणार?’ एकच चिंता.
आम्ही आमच्या मुख्याध्यापिका बाईंना फोन करुन सर्व परिस्थिती सांगितली. फोनवर मोठ्याबाई म्हणाल्या, “काळजी करु नका. उद्या सकाळी मी शिक्षणाधिकाऱ्यांसह टॅक्सीने येते. तुमच्या सर्वांच्या घरी कळविले आहे, काळजी करु नका, मी स्वतः केंद्रावर जात आहे.” त्याकाळी घरोघरी फोन नव्हते. मोबाईल शब्दही जगाला माहित नव्हता. आमच्या शाळेत मुख्याध्यापिकेस आम्ही मोठ्याबाई म्हणायचो. मोठ्याबाई स्वतः येत आहेत म्हटल्यावर, आमचा जीव थोडासा भांड्यात पडला. परत एकदा सौम्य चेष्टामस्करी करुन मनावरील ताण हलका करण्याचा आम्ही मैत्रिणी प्रयत्न करायला लागलो. आमच्या ग्रुपमध्ये हास्याचा धबधबा असलेल्या ‘पंडितबाई’ होत्या. ओकबाईंनी त्यांना चिडवायची संधी सोडली नाही. ओकबाई म्हणाल्या, “आपण सर्वांनी गंभीरपणे कालच्या दिवसाचे वर्णन मोठ्याबाईंना सांगायचे नाहीतर ‘पंडित’ हसत-हसत सांगेल!”
दुसरे दिवशी आमच्या ग. ग. हायस्कूलच्या मोठ्याबाई सौ. राजदेरकरबाई व शिक्षणाधिकारी मांडेसाहेब आले. त्यांनी केंद्रप्रमुखांना फोन लावला. फोनवरुन आदेश आला, “कोणत्याही परिस्थितीत परिक्षा झालीच पाहिजे.”
गावातील एकंदरीत परिस्थिती पाहून, मोठ्याबाईंनी आमच्या राहण्याची व्यवस्था सिन्नरचे उद्योगपती चांडकशेठ ह्यांच्या घरी केली. चांडक परिवाराने आमचे राजेशाही थाटात आदरातिथ्य केले. आमच्या खोलीबाहेर एक काळाकभिन्न राकट सुरक्षा रक्षक उभा केला.
आमच्या सुरक्षेची काळजी घेऊन आमच्या मोठ्याबाई (सौ.आशाताई राजदेरकरबाई) व शिक्षणाधिकारी (माननीय मांडेसाहेब) नाशिकला परत गेले.
गावातील वातावरण हळूहळू निवळले. परिक्षा पार पडली.
---------------प्रभा आठवले माजी शिक्षिका ग. ग. हायस्कूल, नाशिक
रेखा कथाचित्र :-
लेखिकेचे सिन्नर दंगलीतील देवदूतासारख्या भेटलेल्या जोशीक्लार्क बरोबर दंगलीतून मार्गक्रमण करतानाचे स्मृतिचित्र.
चित्रकार :- प्रभा आठवले, नाशिक