top of page

‘जोडाक्षर गेय गति’



आजच्या वर्तमानपत्रातील संख्यानामांवर, पोटतिडकीने स्पष्टीकरण देणाऱ्या, आदरणीय सौ. मंगलाताई नारळीकरांची बातमी वाचताना; डोळ्यासमोर आमची आदर्श मराठी शाळेतील इयत्ता दुसरीची तुकडी ‘इ’ उभी राहिली. आमचा वर्ग बेंबीच्या देढापासून ओरडत, पाढ्यांची चढा-ओढ खेळण्यात रमलेला असायच्या. आमच्या वर्गशिक्षिका आदरणीय खेडकरबाई मुलांचा एक गट व मुलींचा दुसरा गट करुन रोज पाढे/ संख्यावाचन म्हणून घ्यायच्या. एका गटाने २०वर एक एकवीस म्हणताच, दुसऱ्या गटाने २०वर २ बावीस म्हणायचे. अशा पद्धतीने ३० पर्यंतचे संख्यावाचन तसेच पाढे कधी पाठ झाले ! हे आम्हाला प्राथमिक शाळेत समजले नाही. गणितातील एकक, दशक, शतक, सहस्र ह्या संकल्पना, पाठांतर पद्धतीने सहज समजत गेल्या. वेगळ्या शिकवणी क्लासची किंवा घरी आई-वडिलांनी अभ्यास घेण्याची कोणालाच गरज पडली नाही.

हल्ली ‘अकरा, बारा, तेरा’ अशी पोपटपंजी करणाऱ्या बालकांना, ‘सदुशष्ट’ संख्या पटकन सांगता येत नाही. प्राथमिक शाळेतून १०वर १ अकरा असे संख्यावाचन हद्दपार झाल्याने, २१व्या शतकांत प्राथमिक शाळांची ही स्थिती झाली असावी.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे हल्ली चालणारे स्वागत सोहोळे; आमच्या शाळेत नव्हते. रुंग्टा हायस्कूलची स्टेजजवळची विंग हेडमास्तर रोडेसरांच्या कडक शिस्तीत भरत असे. त्यांच्या बरोबर वावरणारे धोतर, टोपी, सदरा अशा पोशाखातील दीक्षितसर, कुलकर्णीबाई, शिरवाडकर बाई आणि आमच्या वर्गशिक्षिका खेडकरबाई अशा शिक्षकांच्या तालमीत आमच्या प्राथमिक शाळेचे रम्य दिवस कधी संपले, हे कळाले नाही. खेडकरबाईंच्या कडक शिस्तीत पाठ झालेली पावकी, दिडकी,अडीचकी ग. ग. हायस्कूलमध्ये मार्कांच्या रुपाने भेटली. त्यामुळे दीड =१ /(१/ २) मार्क म्हणजे १ +१+ २ =४ अशी चूक कधी घडली नाही. एखादे उत्तर देताना किंवा पाढे म्हणताना, तसेच गणित सोडविताना, झालेली छोट्याश्या चूकीसाठी डोक्यावर मिळालेली खेडकरबाईंची टपली आजही आठवते. खेडकरबाईंच्या घरी शनिवार, रविवार किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी अभ्यासाबरोबर केलेली मस्ती; शिर्डी, साकोरी, रावळगाव शुगर फॅक्टरी येथे गेलेल्या शाळेच्या सहली तसेच जहागिरदारबाईंनी स्वतः गाऊन, आमच्या शाळेतील तिसरी -चौथीच्या वर्गातील मुलांचे बसविलेले गीत रामायण. त्यातील मी केलेल्या लक्ष्मणाच्या भुमिकेपेक्षा आजही डोळ्यासमोर उभी रहाते, ती आमची वर्गमैत्रिण किशोरी महागावकरने साकारलेली ‘सीता’.

हल्ली उद्योगक्षेत्रातील तरुण मेकॅनिकल इंजिनिअरस् रिव्हर्स इंजिनिअरिंगचे ड्रॉईंग लगेच तयार करताना आढळतात. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे एखादे यंत्र समोर ठेवून संगणकावर काढलेले आलेखन होय. परंतु ह्या मंडळींना नव-कल्पनेतील यंत्राचे चित्र तर्काने काढता येत नाही. ह्याच कारण शालेय शिक्षणातून बाद झालेली काळ-काम-वेगाची तर्क शिकविणारी गणिते असावीत का? आदर्श मराठी शाळेत आम्हाला काळ-काम-वेगाची गणिते पाटी पेन्सिलने शिकवली. प्रत्येक माणसाचा कामाचा वेग, नळातून पडणाऱ्या पाण्याची गति वेगळी असते; ह्या तर्कसंगत विचारातून ही गणिते शालेय शिक्षणातून हद्दपार झाली.

पाटी-पेन्सिलची जागा, लहानपणी डोळे बिघडविणारे लॅपटॉप लवकरच घेतील. लॅपटॉपवर भराभर चालणारी नव इंजिनिअर लोकांची बोटे (थोडे अपवाद वगळ्यास) संगणकीय प्रोग्रामिंगमध्ये अडखळताना उद्योगक्षेत्रात दिसतात. संगणक प्रोग्रामिंगमध्ये लॉजिकल (तार्किक विचारसरणची) खूप गरज असते. हे लॉजिक इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या पचनी पडताना दिसत नाही.

आमच्या आई-वडिलांच्या पिढीला सत्तावीस आठ्ठे लगेच सांगता येते. त्यांच्या तोंडावर अंकगणित खेळते. कॅल्क्युलेटरची गरज पडत नाही. पाढांतराने तयार झालेला ह्या पिढीचा मेंदू-संगणक आजही व्यवस्थित कार्यरत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील ही पिढी ‘आचार-विचार-उच्चार’ स्वच्छ असावेत, म्हणून आजही जागरुक असलेली दिसते. जोडाक्षरांनी मनुष्याचे उच्चार स्वच्छ होतात .

मध्यंतरी जपानी भाषा शिकताना आमची जपानी शिक्षिका अक्षरशः चवड्यावर बसून, प्रत्येकाचे जपानी उच्चार १०वेळेला म्हणायला लावून स्वच्छ करुन घेत होती. इयत्ता ८वी पासून - नासिकचे डॉक्टर, इंजिनिअर सहित सेवानिवृत्त शिक्षिकेपर्यंत कोणीही तिच्या ड्रिलिंगच्या तडाख्यातून सुटले नाही.

जोडाक्षरांच्या ड्रिलिंगमुळे मराठी मुलांचे उच्चार स्वच्छ होऊन, जगातील कोणतीही भाषा बोलण्याची ताकद आपली माय-मराठी आपल्याला देते. फ्लॉव्हर (Flower)ह्या शब्दाचा उच्चार आमची जपानी शिक्षिका फ्लवर करत होती. तिने फळ्यावर फुलाचे चित्र काढल्यावर, इंग्रजी फ्लॉव्हरचा अंदाज आम्हाला आला. अशा गमती-जमतीत घडत शिकविताना, पंजाबी ड्रेस हा उच्चार सर्व शिरा ताणून ‘पंदाबी डरस्’ उच्चार करीत, ह्या जपानी शिक्षिकेने ‘पंजाबी ड्रेस’ परि